हिराचंद परशुराम बुटाला उर्फ सर्वांचे भाऊ यांच्या
शोकसभेला शेकडो नागरिकांचा भावनिक सहभाग
सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
चंद्रकांत बनकर
खेड ः एचपी बुटाला उद्योग समूहाचे संस्थापक, सहजीवन शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष आणि सर्वसामान्यांचे भाऊ म्हणून ओळखले जाणारे हिराचंद परशुराम बुटाला (उर्फ भाऊ) यांना अखेरचा निरोप देण्यासाठी खेड शहरातील पाटीदार भवन येथे आयोजित शोकसभेला शेकडो नागरिक, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण कोकणाचा हिरा हरपला, अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत भाऊंना अंतःकरणातून आदरांजली दिली.
भाऊंचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान बहुमोल असल्याचे सांगत अनेकांनी त्यांच्या जाण्यामुळे पोकळी निर्माण झाल्याचे नमूद केले. अल्पसंपन्न कुटुंबातून उद्योजकतेच्या शिखरापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. उद्योगविश्वात भाऊ हे केवळ उद्योजक नाही तर आर्थिक परिवर्तनाचे अधिष्ठान होते, अशी भावना उद्योजक वर्गातून व्यक्त करण्यात आली.
भाऊंच्या कुटुंबियांच्यावतीने आयोजित या शोकसभेत विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आपल्या अनुभवातून भाऊंच्या माणुसकीच्या आणि आपुलकीच्या आठवणी उपस्थितांसोबत व्यक्त केल्या. शोकसभेला भाऊंची लाडकी पुतणी योगिता विलासभाई बुटाला यांनी आपल्या काकांबद्दलच्या आठवणी सांगताना सभागृहातील वातावरण अधिकच भावनिक केले.
या शोकसभेत प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॉमर्स ॲण्ड चेंबर्सचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे रवीउदय जाधव, उद्योजक सचिन करवा, निलेश शेठ, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, उद्योजक राजू जोशी, आयसीएस कॉलेजचे प्राचार्य विजय मस्के, ॲड. संतोष कोठारी, रोटरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बिपिन पाटणे, वारकरी संप्रदायाचे प्रमुख केसरी महाराज, पुणे येथील डॉ. संदीप बुटाला, माजी आमदार श्री. मोकल, परशुराम पाथरे, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या गीता बहेन आदी उपस्थित होते. शोकसभेचे सूत्रसंचालन भाऊंचे निकटवर्तीय ॲड. आनंदराव भोसले यांनी केले.
सभेत उपस्थित सर्वांनी एकमताने, भाऊ हे माणुसकीचे प्रतीक आणि कोकणातील उद्योगविश्वाची प्रेरणा होते, अशी भावना व्यक्त करत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. भाऊंच्या आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत जे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी शोकसंदेश पाठवला. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये तसेच भार्गवराम परशुराम देवस्थानचे अध्यक्ष जीवन रेळेकर यांनी शोकसंदेश पाठवला.
दरम्यान बुटाला कुटुंबियांच्या आणि परिवारांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आलेल्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींचे कौस्तुभ बुटाला, अमोल बुटाला, मंगेशभाई बुटाला, प्रमोदभाई बुटाला, विलासभाई बुटाला आणि परिवारांकडून ऋण व्यक्त केले.
नाना-भाऊंच्या असामान्य स्नेहाचा किस्सा
खेडच्या आठवणींमध्ये अमर झाला
डॉ. प्रशांत पटवर्धन यांचा भावुक उल्लेख
खेड ः दैनिक सागरचे संस्थापक संपादक स्वर्गीय नानासाहेब जोशी आणि उद्योजक, सर्वांचे लाडके भाऊ हिराबाई हिराचंद परशुराम बुटाला यांची हृदयांत घर केलेली मैत्री आणि समाजप्रेम आज पुन्हा एकदा खेडवासीयांच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. या दोन थोर विभूतींच्या अपूर्व स्नेहबंधनाची आणि खेडच्या विकासासाठी त्यांनी एकदिलाने केलेल्या प्रयत्नांची आठवण रत्नागिरी जिल्हा उद्योग संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी आपल्या शोकसंदेशातून अत्यंत भावुक शब्दांत व्यक्त केली.
नाना आणि भाऊ हे केवळ मित्र नव्हते, ते खेडच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होते. समाजासाठी काही तरी करण्याची अस्सल तळमळ त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवत होती. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या कार्यामुळे ते खेडवासीयांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील, अशा शब्दांत डॉ. पटवर्धन यांनी आपले मनोगत मांडले. ते म्हणाले की, असे नाना आणि असे भाऊ कोकणच्या लाल मातीत पुन्हा होणे नाहीत. त्यांच्या मैत्रीतील आपुलकी, परस्परांवरील निस्सीम विश्वास आणि समाजासाठी केलेले योगदान हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
खेड नगरीसाठी नानासाहेब जोशी आणि हिराबाई बुटाला यांचे आयुष्य म्हणजेच एक प्रकाशदीप होता. त्यांच्या कार्यामुळे असंख्यांना दिशा आणि धैर्य मिळाले. आज या दोन महामानवांनी दिलेल्या मूल्यांची आठवण काढताना खेडवासीयांचे डोळे पाणावले आहेत. त्यांच्या स्मृती मनांत जपून, त्या स्मृतींना पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हेच त्यांना खऱ्या अर्थाने वाहिलेलं अभिवादन ठरेल.
कोकण, श्रद्धांजली, खेड, महासागर, हिराचंद परशुराम बुटाला, Dainik Sagar, Daily Sagar
कोकणच्या हृदयातील हिरा | भाऊंना श्रद्धांजली | खेडमध्ये अश्रूंचा महासागर | हिराचंद परशुराम बुटाला | Dainik Sagar | Daily Sagar