चिपळूणला पुराचा वेढा
वाशिष्ठी व शिव नद्यांचे पाणी शिरले शहर परिसरात
जनजीवन विस्कळीत,
प्रशासन अलर्ट मोडवर,
कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग
व्यापारी, नागरिकांमध्ये धडकी
शंकरवाडीतील एकजण बेपत्ता
सुशांत कांबळे
चिपळूण : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी अक्षरशः थैमान घातले. आभाळ फाटल्यागत कोसळणारा पाऊस, समुद्राची भरती, कोळकेवाडी धरणातून करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग यामुळे वाशिष्ठी आणि शिव नदीचे पाणी शहरातील सखल भागात शिरून पुराचा वेढा पडला. रस्ते पाण्याखाली गेल्याने विविध मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली होती. पुराचे पाणी दुकानात व घरांमध्ये शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचे रौद्ररूप कायम राहिल्याने वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली. यामुळे सर्व यंत्रसामुग्रीसह प्रशासन अलर्ट मोडवर होते. अधिकाऱ्यांनी संपूर्ण शहरात पाहाणी करीत आढावा घेतला. तसेच शहर व परिसरात 11 पथके तैनात ठेवली आहेत. दरम्यान, पावसाचा जोर सायंकाळी उशिरापर्यंत कायम राहिल्याने नागरिक व व्यापारी वर्गात धडकी भरली होती. दुकानदारांनी आपला माल व साहित्य सुरक्षितस्थळी हलविले तर नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरीत होण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. तर शंकरवाडी येथील एकजण बेपत्ता झाल्याची चर्चा शहरात सुरू होती. कोकण रेल्वेची वाहतूक तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
चिपळूण शहर जलमय
गेल्या चार-पाच दिवसांपासून चिपळूणमध्ये पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली होती. वाशिष्ठी व शिव नदीतील पाणी पात्राबाहेर आल्याने चिपळूण शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली. नाईक कंपनी जवळील बाजारपुलाला पाणी लागल्याने येथील भेंडीनाका, बाजारपेठ, मच्छी मार्केट परिसर, गांधी चौक, रंगोबा साबळे रोड, भाजी मंडई परिसर, जुना एस.टी स्टँड, चिपळूण नगर परिषद परिसर, परकार कॉम्प्लेक्स, चिंचनाका, वडनाका, अनंत आईस फॅक्टरी, वेस मारुती मंदिर तसेच रेल्वे स्टेशन मार्ग, मुरादपूर, बहादूरशेखनाका, भोगाळे, खेर्डी मार्ग, मिरजोळी मार्ग, पेठमाप, इंडियन जीम, मार्ग हा सारा परिसर जलमय झाल्याने वाहतूक बंद पडली होती.
जिल्हा पोलीस अधिक्षकांची चिपळूणला भेट
चिपळुणातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी चिपळूणला भेट दिली. यावेळी त्यांनी पाणी शिरलेल्या भागांची पाहाणी करत आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारी घ्यावी, याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
कोकणात पावसाचे थैमान, कोळकेवाडी, वाशिष्ठी, शिव नद्यांचे पाणी, Daily Sagar, Dainik Sagar
कोकण | पावसाचे थैमान | कोळकेवाडी | वाशिष्ठी | शिव नद्यांचे पाणी | Daily Sagar | Dainik Sagar