कोळकेवाडी धरणासह उपधरणांवर नियंत्रण ठेवल्यास चिपळूणमध्ये पूरस्थिती रोखता येणे शक्य

प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचा महत्त्वपूर्ण अभ्यास, संरक्षण भिंती, गाळ उपसा, प्लास्टिकमुक्ती ही पूरनियंत्रणाची गुरुकिल्ली
               चिपळूण : गेल्या काही दिवसांच्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पूरनियंत्रणाचे ठोस उपाय सुचवले आहेत. कोळकेवाडी धरणासह कामथे, मोरवणे व अडरे धरणांच्या पाणी पातळीवर नियंत्रण ठेवणे, शहरातील काही ठिकाणी संरक्षण भिंती उभारणे, वाशिष्ठी नदीतील बेटे काढणे, नाले सफाई आणि विशेष म्हणजे प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण ठेवले, तर चिपळूण शहराला मोठ्या प्रमाणावर पुराचा धोका कमी करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पूरस्थितीत प्रशासनाचा प्रभावी समन्वय कोळकेवाडी परिसरात फक्त पाच दिवसात तब्बल 1,000 मि.मी. पाऊस झाला. चिपळूणमध्ये फक्त 36 तासात 300 मि.मी. पर्जन्यवृष्टी झाली. मंगळवारी पाणी शहरात घुसले तरी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून मोठे नुकसान टाळले. धरण प्रशासन, महाजनको, पोलीस, लघुपाटबंधारे, कृषि विभाग यांच्या उत्तम समन्वयामुळे पाण्याचा निचरा लवकर झाला. धरण व्यवस्थापन पूरनियंत्रणाची किल्ली कोळकेवाडी धरणातून थेट पाणी सोडले जात नाही; वीजनिर्मितीनंतरचे अवजलच वाशिष्ठीत जाते. पाऊस व भरती-ओहोटीचा ताळमेळ साधून टर्बाइनद्वारे वीजनिर्मितीचे नियोजन केल्यास पाण्याची पातळी समतोल राहाते. त्यामुळे अवजल सोडण्याची वेळ योग्यरितीने बदलता आली आणि पुराचे पाणी नियंत्रणात ठेवता आले. कोयना धरणाचे पाणी चिपळूण परिसरात कधीच येत नाही, हा गैरसमज नागरिकांनी दूर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपधरणांकडेही लक्ष द्यावे लागणार
कामथे, मोरवणे व अडरे ही छोटी धरणे असली तरी त्यांचा परिणाम पूरस्थितीवर होतो. या धरणांची पातळी नियंत्रित ठेवली, तर शहराला मोठा दिलासा मिळू शकतो.
पूरनियंत्रणासाठी ठोस उपाय
संरक्षण भिंतींची गरज : नलावडे बंधाऱ्यामुळे यंदा मोठा फायदा झाला. अशा प्रकारच्या संरक्षण भिंती शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी उभारल्यास पाणी रोखता येईल.वाशिष्ठीतील बेटे काढणे : गोवळकोट परिसरातील मोठी बेटे प्रवाहाला अडथळा ठरत आहेत. ही बेटे काढल्यास नदीचा प्रवाह सुरळीत होईल. ना. नितेश राणे यांनी यासाठी परवानग्यांची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. गाळ उपसा सतत सुरू ठेवावा : मागील दोन वर्षांपासून शासन व नाम फाऊंडेशनच्या मदतीने गाळ काढणीचे काम सुरू आहे. याचा परिणाम लक्षणीय जाणवत असून पूराचा धोका कमी झाला आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत व आमदार शेखर निकम यांनीही या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. नालेसफाई अनिवार्य : एप्रिलपासून शहरात नालेसफाई सुरू करण्यात आली होती. नाल्यांमधील कचरा, विशेषतः प्लास्टिक, वॉटर लॉकिंगला कारणीभूत ठरतो. योग्य सफाई केली तर पावसाळ्यात मोठा फायदा होऊ शकतो. प्लास्टिकमुक्त चिपळूण : पूरस्थितीत सर्वात मोठा अडथळा प्लास्टिक कचरा असल्याचे स्पष्ट झाले. प्लास्टिकमुक्ती ही मोहीम सातत्याने राबवली, तर पूरनियंत्रणाला मोठा हातभार लागेल.

प्रांताधिकारी, आकाश लिगाडे, अभ्यास, संरक्षण भिंती, गाळ उपसा, प्लास्टिकमुक्ती,  पूर नियंत्रण, Daily Sagar, Dainik Sagar

प्रांताधिकारी | आकाश लिगाडे | अभ्यास | संरक्षण भिंती | गाळ उपसा | प्लास्टिकमुक्ती |  पूर नियंत्रण | Daily Sagar | Dainik Sagar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *