रेल्वे, एस्‌‍टी फुल्ल!

कोकणात येणार दहा लाख चाकरमानी
खड्डयांसह वाहतूक कोंडीचे आव्हान
चिपळूण : गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी सज्ज झाले आहेत. यंदा 10 लाख प्रवासी कोकणात दाखल होणार असून प्रवास व्यवस्थापनासाठी रेल्वे, एस्‌‍टी आणि खासगी ट्रॅव्हल्सने मोठी तयारी केली आहे. असे असले तरी खड्डेयुक्त प्रवासामुळे गणरायाच्या सेवेसाठी येणाऱ्या कोकणवासीय भक्तगणांना गणा धाव रे.. म्हणण्याची वेळ आली आहे.
306 विशेष रेल्वे
रेल्वेकडून 306 विशेष गाड्या सोडण्यात आल्या असून सर्व गाड्यांची तिकीटे आरक्षित झाली आहेत. प्रतीक्षायादी 90 ते 200 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
5000 बसेस फुल्ल
एस्‌‍टी महामंडळाने जाहीर केलेल्या 5200 जादा गाड्यांपैकी तब्बल 5 हजार गाड्या फुल्ल झाल्या आहेत. त्यातील बहुतांश ग्रुप बुकींगवर आहेत.
अडीच हजार खाजगी बसेस
तिकीट न मिळालेल्या चाकरमान्यांसाठी खासगी ट्रॅव्हल्स पर्याय ठरत आहेत. मुंबई महानगरातून 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान तब्बल अडीच हजार खासगी बस कोकणासाठी धावणार आहेत.आतापर्यंत दोन हजार बसेसचे बुकींग पूर्ण झाले असून उर्वरित 500 बसचे आरक्षण सुरू आहे.
दरात वाढ
खासगी बसचे दर मात्र झपाट्याने वाढले असून काही खाजगी वाहनधारकांनी मुंबईसावंतवाडी मार्गावर तिकीट 2900 रुपये पासून पुढे तर मुंबई-कणकवली मार्गावर 2800 रुपये ते या पुढील रक्कम आकारली जात आहे. तरीही प्रवाशांचा ओघ कमी झालेला नाही.
खड्डेयुक्त प्रवास
दरम्यान रायगड जिल्ह्यातील कोलाड व लोणेरे नाका, माणगाव प्रवास हा मुंबईहून येताना खड्डेमय रस्त्यामुळे अत्यंत जिकरीचा मानला जातो आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील प्रवास हा अत्यंत बिकट बनला आहे. याशिवाय खेड तालुक्यातील भोस्ते घाट हा अपघाताचा ब्लॅक स्पॉट आहे. चिपळूण शहरात देखील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक मंद गतीने सुरू असते.
सामाजिक एकतेचे दर्शन!
कोकणात पहिल्या टप्प्यात किमान दहा लाख चाकरमानी दाखल होत आहेत. गौरी सणाच्या वेळी आणखीन काही लाख महानगर स्थित उद्योग व्यावसायिक कोकणी मंडळी ही आपापल्या गावात येणार आहेत. या साऱ्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग या तळ कोकणात गणेशोत्सव हा घरगुती असला तरी सामुदायिक रित्या एकत्र येऊन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने सामूहिक आरत्या, नाच, भजन यासह गाव विकासात्मक कामाच्या संदर्भात देखील चर्चा घडत असल्याने गावात एक वेगळेच उत्साह व आनंददायी वातावरण तयार होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे कोकणातील गावागावात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहणार आहे.

रेल्वे, एस्‌‍टी, चाकरमानी,  वाहतूक कोंडी, गणेशोत्सव, Dainik Sagar, Daily Sagar

रेल्वे | एस्‌‍टी | चाकरमानी | वाहतूक कोंडी | गणेशोत्सव | Dainik Sagar | Daily Sagar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *