जिल्हाधिकारी सिंह यांचा जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याचा निर्णय
रत्नागिरी ः पर्यावरणीय सुरक्षा आणि मानवी कल्याणासाठी जैवविविधतेचे जतन अत्यावश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मौजे आंजर्ले आणि मंडणगड तालुक्यातील मौजे वेळास या किनाऱ्यांना जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर यांच्या पुढाकाराने या ठिकाणी वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले की, जैवविविधता वारसा स्थळ घोषित केल्यास जलदरित्या होणारा जैवविविधतेचा ऱ्हास रोखता येईल. विशेषतः ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी सर्वसामान्यांमध्ये जागृती होईल. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाबरोबरच किनारी भागातील पर्यटनालाही चालना मिळेल. मौजे आंजर्ले व मौजे वेळास या ठिकाणांसाठी आवश्यक प्रस्ताव प्राप्त होताच ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया शीघ्रगतीने पार पाडली जाईल व समितीच्या मंजुरीनंतर वारसा स्थळ घोषित होईल.
वेळास व आंजर्ले हे समुद्रकिनारे ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंडी घालण्याच्या प्रक्रियेसाठी जगप्रसिद्ध आहेत. अनेक वर्षांपासून येथे स्वयंसेवक, स्थानिक मंडळे व वनविभागाच्या माध्यमातून कासव संवर्धन मोहिमा राबवल्या जात आहेत. यामुळे या दुर्मिळ समुद्री जीवांचे अस्तित्व टिकविण्यात यश मिळाले आहे.
बैठकीदरम्यान विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) यांनी सादरीकरण करून या किनाऱ्यांवरील जैवविविधतेचे महत्त्व आणि कासव संवर्धनाचे यशस्वी प्रयत्न अधोरेखित केले.
पर्यावरण व पर्यटनाला नवा आयाम
वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर किनारी परिसंस्थेचे संरक्षण व संवर्धन अधिक बळकट होईल. पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळेल. स्थानिकांसाठी रोजगारनिर्मितीची संधी निर्माण होईल. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल.
जिल्हाधिकारी सिंह, जैवविविधता वारसा, दापोली तालुका, कासव संवर्धन, पर्यावरण, Daily Sagar, Dainik Sagar
जिल्हाधिकारी सिंह | जैवविविधता वारसा | दापोली तालुका | कासव संवर्धन | पर्यावरण | Daily Sagar | Dainik Sagar