जगबुडी-नारंगी नद्यांची पुरसदृश्य परिस्थिती
खेड-दापोली राज्य मार्ग ठप्प, खवटीत गोठा कोसळला
खेड: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. जगबुडी आणि नारंगी या दोन प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीची धोक्याची पातळी 7 मीटर असून सध्या ती 6 मीटरपेक्षा जास्त पातळीवरून वाहत आहे. परिणामी खेड शहरातील मटण-मच्छी मार्केट परिसरात नदीचे पाणी शिरून 15 ते 20 दुकाने पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. हा परिसर पाण्याखाली आला असुन व्यापाऱ्यांमध्ये नुकसान होण्याची भीती आहे. स्थानिक नागरिकांनी सुरक्षिततेसाठी लहान होड्या तैनात केल्या आहेत.
नदीकाठच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने खेड-बहिरवली मार्गावरील सुसेरी गावानजीक खाडीपट्टा विभागातील जवळपास 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला आहे. या भागातील रस्त्यांवरून पाणी वाहत असून नागरिकांना प्रवास करणे कठिण झाले आहे. दरम्यान, नारंगी नदीनेही इशारा पातळी ओलांडल्यामुळे खेड-दापोली-मंडणगड या मुख्य मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. एकविरानगर परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने एसटी बस व खासगी वाहने जाग्यावरच अडकल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन केले आहे.
ग्रामीण भागातही पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. खवटी गावातील शेतकरी महादेव पांडुरंग गावणकर यांच्या शेतातील गोठा रविवारी सकाळी कोसळून अंदाजे 32 हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी भरणे मंडळ अधिकारी उमाकांत देशमुख यांनी पाहणी करून महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आला असून शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
चिपळुणात बाजारपूल आणि मिरजोळी रस्त्यावर पाणी
चिपळूण : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाचा जोर रविवारी (17 ऑगस्ट) ही कायम राहिला. काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे सकाळी वाशिष्टी नदी दुथडी भरून वाहत होती. मात्र, नदीची पातळी धोकादायक थरापर्यंत पोहोचली नसल्याने नागरिक आणि प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. नाईक कंपनी व भेंडीनाका परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने छोटे विक्रेते व स्थानिक नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
दुकाने, हातगाड्या आणि पथ विक्रेत्यांचे व्यवसाय ठप्प झाले. विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग मिरजोळी येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहन चालकांची अडचण झाली. आधीच रस्त्यावर पडलेले खड्डे त्यातच रस्त्यावर पाणी आल्याने मार्गक्रमण करतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. खेंडमध्ये दरड कोसळली. तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे खेंड परिसरामध्ये नरळकर यांच्या घराच्या पाठीमागे दरड कोसळली. चिपळूण नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेद्वारे मातीचा मलबा काढण्यात आला. वाशिष्टीची पाणी पातळी वाढल्यानंतर नाईक कंपनी ब्रिज जवळील वन वे मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात चिखल साचला. चिपळूण नगरपालिकेतर्फे रस्ता स्वच्छ करण्यात आला सकाळपासून प्रशासन सतर्क मोडवर होते. पावसाचा जोर दुपारनंतर किंचित ओसरला असला तरी, दिवसभर रिमझिम व जोरदार सरींचा सिलसिला अखंड सुरूच राहिला.
खेड, चिपळूण, धुवाँधार, रस्ते, पाण्याखाली, Dainik Sagar, Daily Sagar
जगबुडी-नारंगी नद्यांची पुरसदृश्य परिस्थिती | वाशिष्टी नदी दुथडी भरून वाहत होती | Dainik Sagar | Daily Sagar