सत्तेवर येताच एका छोट्याशा देशाने भारताविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. हा देश भारताचा शेजारी आहे. भारतावर या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सत्तेच्या गादीवर येणार, हे स्पष्ट होताच या देशाच्या नव्या राष्ट्रप्रमुखाने भारताविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. या देशाच्या राष्ट्रप्रमुखाने भारत विरोधी मुद्यावरच निवडणूक लढवली होती. त्यामुळे सत्तेवर येताच आश्वासनांची पूर्तता करण्यास प्राधान्य दिलं आहे. मोहम्मद मुइजू या मालदीवच्या नव्या सत्ताधीशाने ही भूमिका जाहीर केलीय. राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संभाळल्यानंतर पहिल्या आठवड्यातच भारतीय सैनिकांना मालदीवमधून हटवणार असं मोहम्मद मुइजू यांनी म्हटलं आहे. पुढच्या महिन्यात मोहम्मद मुइजू अधिकृतपणे राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार संभाळतील. डिप्लोमॅटिक मार्गानेच आपण भारतीय सैन्य हटवू असं मुइजू यांनी म्हटलं आहे.